Monday, May 05, 2008

Atishay sundar vichar...

Aajchya esakal madhe ha ek apratim lekh vachla. toch ithe lekhikechya naavasakat post karte ahe.

आभाळमाया - हे जीवना
नलिनी वाळिंबे यांचा लेख वाचला आणि मी माझ्या साताऱ्याच्या आयुष्यात परत गेले. मी, आई, बाबा, भाऊ असं आमचं कुटुंब त्यांच्या घरात राहायला गेलो. शेजारी आजी, आजोबा आणि त्यांची मुलगी सुलूमावशी राहायचे. लहानपणी पोलिओ झाल्याने मावशीचा एक पाय अधू होता. काही कारणाने त्यांची उंचीही खूपच लहान होती. त्यामुळे येणारा जाणारा तिऱ्हाईक त्यांच्याकडे केविलवाणे नजरेने बघायचा. परंतु अशी ही मावशी स्वतःच्या व्यंगाकडे दुर्लक्ष करून उच्च शिक्षण घेऊन स्वतः एका इन्स्टिट्यूटची प्रमुख होती. वाचन आणि कला हे त्यांच्या रक्तात भिनलं होतं. सुंदर पेंटिंग त्या करायच्या. त्यांच्या गच्चीवर त्यांनी छोटी बाग सजवली होती. नवीन नवीन छंद जोपासणे, निरनिराळी माहिती गोळा करणे, गाण्याच्या मैफिलीला जाणे, साहित्य संमेलनास जाणे हा त्यांचा आवडीचा विषय असायचा. पण असून नसलेल्या उणिवांची त्यांनी कधीही तक्रार केली नाही. प्रत्येक दिवसाला अभिवादन करून त्याचा स्वीकार त्यांनी केला.

""आजकाल तुझी काहीतरी सतत तक्रार चालू असते- हे दुखतंय... ते दुखतंय.. मग इथे जायलो नको, तिथे जायला नको,'' असं म्हणून रविवारी पतिराजांनी जरा लवकरच जागं केलं. आम्ही रांजणगावला जाण्याचं ठरवलं. जाता जाता शिक्रापूर या गावातून गेलो. हे नाव कानी पडताच पुन्हा एकदा मी साताऱ्याच्या आयुष्यात गेले. विचारांचा तळ ढवळला होता. एकदम माझ्यासमोर माझी शाळा, कॉलेज विश्‍व, माझ्या मैत्रिणी आल्या. आणि माझी जिवलग मैत्रीण नंदिनी. आम्ही एफ.वाय.मध्ये असतानाच तिचं लग्न झालं आणि लग्न करून ती या गावात आली होती. त्यांच्या घरात मुलीचं शिक्षण याला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं आणि तेव्हाच तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. पुढे २/३ वर्षे आमचा पत्रव्यवहार व्हायचा. ती सर्व खुशाली सांगायची. एकंदरीत सासरी सर्व चांगलं आहे, हे ऐकून खूप आनंद झाला होता. आता पुन्हा "शिक्रापूर' गावातून जाताना आठवणी गोळा झाल्या. आणि ठरवलं की परतताना आपण तिची गाठ घेऊनच पुढं जायचं. कोणीतरी म्हणालं की त्यांच्या यजमानांचं नुकतंच निधन झालं आहे. विचारत विचारत तिच्या घरापाशी पोचलो तेवढ्यात ती अचानक बाहेर आली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून मी सुटकेचा श्‍वास सोडला आणि आम्ही एकमेकींना आलिंगन दिलं. मला पाहून तिलाही आश्‍चर्याचा धक्का बसला. शब्दांची जागा अश्रूंनी घेतली होती. आत गेलो आणि कळलं, की तिच्या पतीचं निधन झालंय. पण एका खेडेगावात बाई असुरक्षित असते म्हणून तिनं मंगळसूत्र घातलं होतं. आजारपणात पाण्यासारखा पैसा गेला आणि आता जमीन, घर यासोबत ती सासू, मुलांसहित राहत होती. दिवस पालटले होते. आलेल्या परिस्थितीला धीरानं सामोरं जाऊन ती पुन्हा उभी होती. मी मात्र कोलमडून पडले होते. आयुष्यात एवढं मोठं दुःख पचवून ती पुढच्या जीवनप्रवासासाठी न खचता तयार होती. आणि "मी' छोट्या छोट्या कारणानं दुसऱ्यावर चिडत असे. वाटलं, एवढ्या ल
हानपणी नंदिनीला तिच्या आयुष्यानं काय काय दाखवलं, तरी ती पुन्हा उभी आहे. दुसरीकडे शरीरानं अधू असणारी सुलूमावशी सर्वत्वावर मात करून आयुष्य एका सेनापतीसारखं लढली आणि आयुष्याच्या संध्याकाळी तेवढीच उत्साही आहे. असं म्हणतात, की नेहमी आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे बघावं म्हणजे आपल्याकडं असलेल्या गोष्टीची किंमत कळते. जीवन जगण्याची ताकद बघायची असेल तर नंदिनी व सुलूमावशीकडे मी बघते. कारण आपण जीवनात कुठे आहोत याची जाणीव होते.

- सौ. समृद्धी जोशी

Mazi aai mala nehmi hech sangaychi/ ajunhi sangte, ani te aatmasaat karaycha me prayatna hi kela. Pan tari ajunahi pushkalda chotya chotya goshtinvarun kach khanyachi manaachi tayaari hote. Tevha ase lekh vaachun maanasik ubhaari yete. Tymule navin varshachi mazya blogchi suruvat mee hya lekhadware karte ahe.